क्वालिस कंटेनरचा भीषण अपघात; एक ठार दोन गंभीर

संगमेश्वर:- मुंबई गोवा महामार्गावर क्वालिस आणि कंटेनर या दोन वाहनांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. संगमेश्वर जाखमाता मंदिरानजीक रविवारी सकाळी हा अपघात घडला.

गोरेगांव मुंबईहून मालवण जि. सिंधुदुर्गला निघालेली क्वालीस ( एम. एच. ०४- ए. वाय. ८०८८) चालक निखील टेमकर हा भरधाव वेगाने जात असतांना मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जाखमाता मंदिर नजीक क्वालीसची समोरुन येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक बसली. या भिषण अपघातात क्वालीसमधील सीमा पडवळ वय ५६ रा. गोरेगांव मुंबई या जागीच ठार झाल्या तर जगदीश पडवळ वय ६०, सौरभ पडवळ वय २५ दोन्ही रहाणार गोरेगांव, मुंबई हे गंभीर जखमी झाले.

क्वालीसची कंटेनरला बसलेली धडक एवढी जोरदार होती की, क्वालीसची पुढील बाजू कंटेनरच्या खाली जावून सर्व प्रवासी आतमध्ये अडकून पडले. संगमेश्वर येथील संतोष खातू, रौफ खान, निखिल लोध आदींनी जखमींना बाहेर काढले. याच दरम्यान, देवरुख येथील व्यापारी संजय पटेल महामार्गावरुन जात असताना त्यांनी आपल्या कारमधून जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघातामधील जखमी जगदीश पडवळ आणि सौरभ पडवळ यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी डेरवण हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास हे कॉ. भाई झापडेकर हे करीत आहेत.