कोरोना बाधिताना 10 दिवसांनी डिस्चार्ज

क्वारंटाईनचे नवे नियम ; संभ्रमाचे नाही कारण

रत्नागिरी:- क्वारंटाईनचे नवे नियम बाधित किंवा संशयितांना दिलासा देणारे आहेत. नव्या निकषाप्रमाणे बाधितांचा डिस्चार्ज कालावधी 10 दिवस करण्यात आला आहे. त्यामध्ये शेवटेच 3 दिवस देखरेखीखाली ठेवून काहीच लक्षणे आढळली नाहीत तर स्वॅब न घेता क्वारंटाइन सेंटरमधून सोडण्यात येणार आहे. मात्र त्याने 7 दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. तो कोरोनावाहक असू शकतो, परंतु दुसर्‍याला संसर्ग देण्याची क्षमता किंवा दाहकता त्या विषाणूमध्ये नसल्याने संसर्ग रोखता येतो, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

क्वारंटाईनच्या नव्या नियमांनी नागरिकांमध्ये संभ्रम आणि अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. येथील क्वारंटाईन सेंटरमधून काही बाधितांना क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर स्वॅब न घेता घरी होम क्वारंटाईनसाठी पाठविल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर या नव्या नियमांचा उलगडा झाला आहे. पूर्वी कोरोनाबाधिताचा 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी होता. त्यानंतर त्याचा स्वॅब घेऊन तो निगेटिव्ह आल्यास त्याला पुन्हा 14 दिवस होम क्वारंटाईन केले जात होते. या सर्व प्रक्रियेमध्ये दुसर्‍या जिल्ह्यात जाणार्‍याला किंवा घरी जाणार्‍यांचा महिन्याचा कालावधी जात होता. मात्र शासनाने या निकषांमध्ये आता बदल केला आहे. त्यामुळे आता 14 दिवसांचा कोव्हिड रुग्णालयात किंवा 14 दिवसाच्या होम क्वारंटाईनची गरज नाही. बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर कोव्हिड रुग्णालयात 10 दिवस उपचार होणार. शेवटचे तीन दिवस देखरेखीखाली ठेवून त्यानंतर त्याला कोव्हिड सेंटरमध्ये तीन दिवस ठेवून काहीच लक्षणे न आढळल्यास स्वॅब न घेता त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पाच ते सात दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. नव्या नियमांनी लोकांमध्ये संभ्रम असला तरी आरोग्य विभागाने ते सुरक्षित असल्याचा दावा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केला. 

शासनाच्या नव्या निकषानुसार दहा दिवसानंतर काहीच लक्षणे आढळली नाहीत तर कोव्हिड सेंटरमधून स्वॅब न घेता घरी सोडण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन व्हायचे आहे. तो कोरोना वाहक असू शकतो, परंतु उपचारानंतर दुसर्‍याला संसर्ग देण्याची क्षमता किंवा दाहकता त्या विषाणूमध्ये नसल्याने संसर्ग होत नाही अशी माहिती अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.