रत्नागिरी:- कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीतच जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 1 ते 10 जुलै या कालावधीत तब्बल सव्वा दोनशेजणांना कोरोनाची लागण झाली आणि विशेष म्हणजे कोरोना विरोधात लढा देणाऱ्या कोरोना योध्यांचा या कोरोना बाधितांमध्ये समावेश होता. या अनुशंगाने प्रशासनाने केलेल्या टाळेबंदीचा फायदा पुढील आठवड्यातील रुग्ण संख्येवर होईल अशी आशा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचा बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधिताची नोंद एप्रिल महिन्यात झाली. मे महिन्यात त्यात मोठी भर पडली नव्हती; मात्र मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर बाधितांची संख्या वाढली. मे महिन्यात एक लाखाहून अधिक चाकरमानी दाखल झाले. या कालावधीत प्रशासनाकडून केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा उद्रेक झाला नाही. मे महिन्यात पावणेतीनशे कोरोना बाधित सापडले. मुंबईतून आलेल्यांच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. जुन महिन्यात 327 रुग्ण आढळले. या कालावधीत बाहेरुन सुमारे 55 हजाराहून अधिक लोक जिल्ह्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात सव्वा दोनशे रुग्ण कोरोना बाधित आढळले. या काळात बाहेरुन आलेल्यांची संख्या आठ हजार इतकी आहे.
टाळेबंदी शिथिलतेनंतर प्रशासनाकडून केलेल्या सुचनांचे योग्य पालन न केल्यामुळेच त्याचा परिणाम रुग्ण संख्येत वाढ झाली. जुन, जुलै महिन्यात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कोरोना संक्रमण सुरु झाल्याचा दावा केला जाऊ लागला आहे. पोलिस, नर्स आदी कोविड योध्ये कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. चार महिन्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली तालुक्यात आहेत. सोशल डिस्टन्सिंगसह गर्दी टाळणे, सॅनिटायझर, हात धुणे, संपर्क टाळणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. टाळेबंदीतील शिथिलतेनंतर एकमेकांच्या संपर्कात आलेल्यांमुळे त्यात वाढ झाल्याचे निदर्शनास येते. ग्रामकृती दलांनी गावागावात चांगल्या पध्दतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कडक टाळेबंदी लागू केली. 1 ते 8 जुलै या कालावधीत कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. परजिल्ह्यातून येणार्यांवर योग्य निर्बंध घातल्याने कोरोनाची साखळी तुटणे शक्य होईल. गर्दी टाळण्यासह सुरक्षितता बाळगणे हाच कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय असल्यामुळे प्रत्येकाने जीवनशैली बदलण्याची गरज आहे.