रत्नागिरी:- विद्युत तारेने शॉक देऊन डुकराची शिकार करणार्या त्या शिकार्यांकडून आणखी काही शिकारीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने वन विभागाने कायद्याच्या तरतुदीनुसार संशयितांकडुन या गुन्ह्याच्या चौकशीला पुर्ण सहकार्य करण्याचा बॉण्ड करून घेतला आहे.
लांजा तालुक्यातील खेरवसे येथे काल शिकारीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वन विभागाने विशाल उद्धव चव्हाण (वय 30), विनोद केशव जाधव (वय 47), सुनील अनंत शिदें (40, सर्व रा. खेरवसे, ता. लांजा) यांना ताब्यात घेतले. खेरवसे येथील एका व्यक्तीने वन विभागाला शिकारबाबत टीप दिली होती. श्री. सकपाळ (रा. मालवण) यांच्या खेरवसे येथील आंबा व नारळाच्या बागेत संशयितांनी रान डुक्कराच्या शिकारीसाठी विद्युत तारा लावून ठेवल्या होत्या. शॉक देऊन त्यांनी डुकराची शिकार केली होती. याची माहिती मिळताच रत्नागिरी परिक्षेत्र वन विभागाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी रान डुकराला शॉक देऊन मारल्याचे दिसून आले. हे सर्वजण डुकराच्या मांसाचे तुकडे करण्यात काल त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार लोखंडी सुरी, एक कोयता, चार्जिंग बॅटरी 2, अॅल्युमिनियम वायर, बायंडिग वायर हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडुन शिकारीचे आणखी काही प्रकार घडले असल्याचा संशय आहे. त्याअनुषंगाने वन विभागाने तपास सुरू केला आहे. मात्र या संशयितांनी तपासाला पुर्ण सहकार्य करण्याचे कबुल केले असून तसा बॉण्ड करण्यात आला आहे. वन विभाग तपासाच्या अनुषंगाने जेव्हा बोलवतील तेव्हा त्यांना हजर होणे बंधनकारक बनले आहे.