कोंडीवरे येथे ब्लॅक पॅन्थर; वन विभागाकडून दुजोरा

रत्नागिरी:- दुर्मिळ वन्य प्राण्यांपैकी एक आणि वेगळ्या रुबाबाचा ब्लॅक पॅन्थरचे (बिबट्या) आज संगमेश्‍वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दर्शन झाले. आज सकाळीच या भागात त्याचा वावर असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर शेअर केला. वन विभागाने त्याला दुजोरा दिला. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच तेथे कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.

‘जंगल बुक‘चित्रपटामधील बगिरामुळे ब्लॅक पॅन्थर म्हणजे काय हे सर्वश्रुत झाले आहे. जिल्ह्यात त्याचे वास्तव्य म्हणजे वन विभागाला आणि जिल्हावासीयांना अप्रूपच. पट्टेरी वाघाबाबतही यापूर्वी चर्चा सुरू होती. मात्र वन विभागाने ती अफवा असल्याचे सांगितले. चांदोली अभय अरण्यात पट्टेरी वाघ आहे, परंतु जिल्ह्यात नाहीत. ब्लॅक पॅन्थरबाबतही तसेच होते. जिल्ह्यात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जंगलातील त्यांचा अधिवास कमी होऊन ते मानवी वस्तीमध्ये शिरत असल्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात पाहायला मिळतात. ब्लॅक पॅन्थर ही बिबट्याची जात आहे. मात्र त्याचा रंग पूर्ण काळा म्हणून तो विशेष आणि दुर्मिळ आहे.

यापूर्वी राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅन्थरला जीवदान देण्यात आले होते.
त्यानंतर गुहागरमध्ये एका ब्लॅक पॅन्थरचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. आता संगमेश्‍वर तालुक्यात बगिराचा वाढता वावर चर्चेचा विषय बनला आहे. आज सकाळीच कोंडीवरे येथील जंगलात ब्लॅक पॅन्थचे अनेकांना दर्शन झाले. ग्रामस्थांनी त्याचा व्हिडिओ केला असून तो वन विभाग आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत रत्नागिरी वन अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. गुहागर, राजापूरनंतर आता संगमेश्‍वर तालुक्यातही ब्लॅक पॅन्थर आढळून आला ही पर्यावरणप्रेमीना आनंदाची बाब आहे.