रानडुकराची शिकार पडली महागात; शिकारी अडकले वनविभागाच्या जाळ्यात

रत्नागिरी:- विद्युत तारेने शॉक देऊन डुकराची शिकार करणार्‍या तिघांना वन विभागाने अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी वन विभागाने छापा टाकून शिकार्‍यांना जेरबंद केले. आज सायंकाळी लांजा तालुक्यातील खेरवते येथे ही कारवाई झाली. मृत डुकरासह चार लोखंडी सुर्‍या, एक कोयता, 2 चार्जिंग बॅटरी, अ‍ॅल्युमिनियम वायर, बायंडिग वायर हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

विशाल उद्धव चव्हाण (वय 30), विनोद केशव जाधव (वय 47), सुनील अनंत शिदें (40, सर्व रा. खेरवसे, ता. लांजा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. खेरवसे येथील एका व्यक्तीने वन विभागाला याची टीप दिली होती. संशयितांनी प्रकाश सकपाळ (रा. मालवण) यांच्या आंबा व नारळाच्या बागेत रान डुक्कराची शिकार करण्यासाठी विद्युत तारा लावून ठेवल्या होत्या. शॉक देऊन त्यांनी डुकराची शिकार केली. मात्र याची माहिती मिळताच रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, पाली वनपाल गौ. पी. कांबळे, लांजा सागर तपाडे, वनरक्षक जाकादेवी म. ग. पाटील, वनरक्षक लांजा विक्रम कुंभार यांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा रान डुकराला शॉक देऊन मारल्याचे दिसून आले. हे सर्वजण डुकराच्या मांसाचे तुकडे करण्यात आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार लोखंडी सुरी, एक कोयता, चार्जिंग बॅटरी 2, अ‍ॅल्युमिनियम वायर, बायंडिग वायर हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विभागीय वन अधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.