लाटांच्या माऱ्यात जहाजाची दुरवस्था, जहाजात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा शिरकाव
रत्नागिरी:- मिर्या येथे अडकलेल्या बसरा स्टार जहाज चेपूण, फाटून दयनिय अवस्था बनली आहे. त्यामुळे जहाजामध्ये पाणी भरत असून त्याची किनार्यावरच दुरूस्ती करणे अत्यावश्यक बनले आहे. दुरूस्तीनंतरच ते समुद्रात ओढता येणार आहे. त्यामुळे जहाजाचा मुक्काम अनिश्चित कालावधीसाठी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान जहाजावरील डिझेल काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
जहाज वाचविण्याच्यादृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींनी जहाजावरील जळके ऑइल काढण्यात आले. सुमारे सात हजार लिटर ऑइल बॅरलमध्ये काढण्यात आले. याला तिन ते चार दिवस गेले. त्यानंतर लगोलग जहाजामधील 25 हजार लिटर डिझेल काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली. हे काम अंतिम टप्प्यात आहे. जहाजावरील इंधन रिकामे केल्यानंतर समुद्र किनारा सुरक्षित ठेवण्यास प्रादेशिक बंदर विभगाला यश आले आहे. मात्र आता जहाज काढण्याची जटील समस्या बंदर विभाग आणि जहाज एजन्सीपुढे आहे.
सव्वा महिना व्हायला आला हे जहाज उधाणाची भरती आणि आमावस्येची हाय टाईट भरतीचा सामना करीत आहे. समुद्राच्या अजस्र लाटांनी जहाजाचे मोठे नुकासन झाले आहे. अनेक ठिकाणी जहाज चेपले गेले आहे. तर काही ठिकाणी ते फाटल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जहाज बाहेर काढताना त्याची किनार्यावरच दुरूस्ती करणे अनिवार्य बनले आहे. जहाजामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरत आहे. या परिस्थितीत जहाज ओढून काढले तरी ते पाण्यात तरंगण्याऐवजी बुडेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याच संबंधित यंत्रणेकडुन सांगण्यात आले.
किनारा सरक्षेच्यादृष्टीने जहाजामधील ऑइल, डिझेल काढण्यात आम्हाला यश आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र जहाज भरपुर डॅमेज झाले आहे. काही ठिकाणी फाटले आहे. किनार्यावर दुरूस्ती करूनच ते काढावे लागलणार आहे अशी माहीती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. उगलमुगल यांनी दिली.