मिरजोळेतील रस्ता दुरुस्ती कामाची सखोल चौकशी करा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना

रत्नागिरी:- पालिकेच्या सुधारित नळपाणी योजनेची मुख्य जलवाहिनी मिरजोळे गावातील रस्त्यातून टाकण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुमारे सव्वा कोटी रुपये भरले आहेत. मात्र मिरजोळे येथील रस्त्याच्या  दुरुस्तीचे काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्ता खचला आहे. या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे केल्या आहेत.

भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी हा विषय लावून धरला आहे. पालिकेलाही याबाबत श्री. चवंडे यांनी निवेदन दिले आहे. रत्नागिरीत शहरात सुधारित पाणी योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी शीळ धरणातून साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. मिरजोळे येथील रस्त्यातून ही जलवाहिनी आली. यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे नुकसान होणार असल्याने त्याच्या दुरूस्तीसाठी पालिकेने बांधकाम विभागाला सव्वा कोटी रुपये भरले.

जानेवारी 2020 दरम्यान हे काम पूर्ण झाले. मात्र बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने अतिशय घाईगडबडीने आणि निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे हा रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे. रस्ता बंद होऊन तेथील ग्रामस्थांची गैरसोय होऊ शकते. पावसात या खचलेल्या रस्त्याची अधिक दुर्दशा होणार हे निश्‍चित आहे. कंत्राटदाराने रस्त्याचे काम तंत्रशुद्ध व योग्य दर्जाचे न केल्याने दोन महिन्यात तो रस्ता खचला आहे. तेथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शासकीय निधीचे नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटतादावर कारवाई करण्यात यावी व त्याचे नाव काळ्यायादीत टाकावे, असे श्री. दरेकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.