पहिल्याच बैठकीत सकारात्मक निर्णय; रेस्टॉरंट सुरू होण्याची चिन्हे

रत्नागिरी:– लॉकडाऊचा सर्वांत मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. 33 टक्के लॉजिंग आणि केवळ त्यासाठीच किचन सुरू करुन याचा आर्थिक फटका व्यवसायिकांनाच सहन करावा लागणार आहे. व्यवसाय बंद असतानादेखील वाढीव वीज बिल हॉटेल व्यावसायिकांना भरावी लागणार आहेत अशा परिस्थितीत हॉटेल व्यावसायिकांना रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत केली. यावर ना. उदय सामंत यांनी तात्काळ मुख्य सचिवांसोबत बोलून हॉटेल व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदय सामंत यांनी शुक्रवारी संवाद साधला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष रमेश कीर, हॉटेल व्यावसायिक मृत्युंजय खातू, अभिमन्यू वणजु, अभिजित खाडिलकर, अभय जोग आदी उपस्थित होते.

यावेळी आपल्या मागण्या मांडताना रमेश कीर म्हणाले, शासनाने टुरिझमला अजूनही म्हणावा तसा दिलासा दिला नाही. किमान रेस्टॉरंटला तरी उघडण्यास परवानगी मिळणे गरजेचे आहे. लॉजिंग सोबत इतर सर्वच उपाहार गृहे सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. वीज बिलामधील विविध कर कमी करून सरासरी ऐवजी प्रत्यक्ष खपाएवढेच बील आकारण्याच यावे. नगरपरिषदेच्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलामध्ये सहा महिन्यासाठी माफी मिळावी किंवा कमर्शियल दराने आकारणी न करता घरगुती दराने आकारणी करावी अशा मागण्या केल्या. यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना उदय सामंत यांनी प्रशासनाला दिल्या. हॉटेल व्यावसायिकांना सवलती मिळण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवावा. याबाबत मी तातडीने मुख्य सचिवांशी बोलून आवश्यक खबरदारी घेऊन हॉटेल व्यवसाय सुरू करावा, यासाठी मी स्वतः ही आग्रही आहे, असे मत उदय सामंत यांनी या बैठकीत मांडले. सामंत यांनी पुढाकार घेतल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 या व्यावसायातून वर्षाला कोट्यवधीची उलाढाल होते. जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळते. मात्र कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हा व्यवसाय पुरता बसला आहे. हे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत देखील जिल्ह्यातील व्यावसायिकांकडे लक्ष ठेवल्याबद्दल रमेश कीर यांनी उदय सामंत यांचे विशेष कौतुक केले.