तब्बल 21 तासांनी कशेडी घाटातून वाहतूक सुरू

खेड:- रायगड जिल्ह्यातील धामणदेवी येथे मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटातील वाहतूक तब्बल 21 तासांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरु झाली आहे. दरड कोसळून 21 तास वाहतूक ठप्प होण्याची घटना मुंंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मुंबई-गोवा मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे दरड कोसळल्याने आणि त्यात मुसळधार पाऊसही असल्याने पुरते हाल झाले.

गुरूवारी 9 जुलै रोजी रात्री आठ वाजता रस्त्या कडेच्या डोंगराचा भाग खचून भलामोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती कशेडी महामार्ग पोलिसांना  समजताच त्यांनी पोलादपूर प्रशासन व महामार्ग प्रशासन तसेच एल अँड टी कंपनी यांना माहिती  दिली. यावेळी तातडीने पोलादपूरचे नायब तहसीलदार समीर देसाई, पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. तर हायवेचे विक्रम गुंजाळ धायगुडे आणि खेड हद्दीतील कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह सर्व पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली होती. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने हालचाली करून  महामार्ग प्रशासन व एल अँड टी कंपनीच्या अधिकार्‍यांनी जेसीबी व पोकलेनच्या साह्याने रात्री उशिरा 9 यानंतर दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात केली होती.
 

दरड हटविण्याचे काम गुरुवारी रात्रभर सुरु होते. मात्र, मातीचा मोठा ढिगारा खाली आल्याने आज शुक्रवारी सायंकाळी दरड बाजूला करून महामार्ग एकेरी वाहतुकीला मोकळा  करण्यात आला आहे.
संपूर्ण रात्रभर युध्दपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू असताना सकाळी तहसील कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षाकडून नायब तहसीलदार समीर देसाई यांनी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दरड हटवून घाटर स्ता सुरू होईल अशी माहिती दिली होती. मात्र साधारणपणे सकाळी साडेनऊ वाजता पावसाचा जोर वाढला आणि पुन्हा त्याच ठिकाणी डोंगरातील कातळालगतचा मातीचा भराव कोसळल्याने हे दरड हटविण्याचे काम अधिक वाढले.

दरड हटविण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे पोलादपूर येथे वाहतूक पोलिसांनी कशेडी घाटातून कोकणात जाणार्‍या वाहनांना रोखून धरल्यामुळे तब्बल दहा किमी अंतरापर्यंत ट्रक, टँकर्स, कार, टेम्पो आणि मालवाहू गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहनांतील प्रवाशांना गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी जेवणापासून सर्वच बाबींची कुचंबणा झाली.