जिल्ह्यात 65 पैकी 34 धरण ओव्हरफ्लो 

समाधानकारक पावसाचा परिणाम, उर्वरित धरणात देखील मोठा पाणीसाठा 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. या पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या 65 धरणांपैकी 34 धरणं 100 टक्के भरली आहेत. या 34 मध्ये 2 मध्यम प्रकल्पांचाही समावेश आहे. गडनदी आणि अर्जुना हे दोन मध्यम प्रकल्पही 100 टक्के भरले आहेत. तर 2 धरणं 90 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत.

गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसत असल्याने काही धरणं 100 टक्के भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 2, दापोलीतील 5, खेड मधील 4, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 1, संगमेश्वरमधील 5, रत्नागिरीतील 1, लांजा तालुक्यातील 5, राजापूरमधील 4 अशी जिल्ह्यातील 34 धरणं 100 टक्के भरली आहेत.