रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या विळख्यात कोरोना योद्धेच सापडू लागले आहेत. तळागाळात ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने मैदानात उतरले आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय दौरे त्यांनी सुरू केले आहेत. सदस्यांसह पदाधिकार्यांना एकत्रित घेऊन बने यांनी गुरुवार 9 जुलै रोजी सात गावांमध्ये आढावा घेत विकासकामांचीही माहिती घेतली.
कोरोनाचा प्रसार वाढत असला तरीही जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागातील कारभाराला चालना देण्यासाठी अध्यक्ष बने यांनी आढावा दौरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संगमेश्वर तालुक्यातून त्याला सुरवात झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभुमीवर संगमेश्वर तालुक्यात आरवली, कडवई, कसबा, काटवली, कोसुंब, बेलार बु, साखरपा या भागात बने यांनी दौरे केले. काही दिवसांपुर्वी आलेले मुंबईकर चाकरमानी स्थिरावले असून आता नव्याने परजिल्ह्यातून येणार्यांमार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. गावपातळीवरच नव्हे तर आरोग्य विभागात काम करणारे कोविड योध्देच कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. हे लक्षात घेऊन गावागावातील लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटपही बने यांच्या हस्ते या दौर्यात केले जात आहे. यामध्ये आरोग्य सभापती बाबू म्हाप यांच्यासह संगमेश्वर सभापती बंडा महाडिक, जिल्हा परिषद सदस्य नेहा माने, वेदा फडके, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, बंडा महाडिक यांच्यासह पंचायत समिती सदस्य, सरपंच, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवकांचीही उपस्थिती होती. आढावा बैठकीवेळी गर्दी होणार नाही याची काळजीही घेण्यात आली हाती.
याप्रसंगी रोहन बने म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडीसेविका यांच्यासह सर्वांनीच चांगल्या पध्दतीने काम केले आहे. त्यांनी हीच उर्जा सतत राहावी. तुमच्या पाठीशी प्रशासन कायम आहे. गावागावात ग्रामकृतीदलाने केलेल्या कामाची प्रशासनाला जाणीव आहे. प्रत्येकजणं आशेने या कृती दलाच्या सदस्यांकडे पाहत आहेत. त्याच तत्परतेने भविष्यातही काम करत राहावे.
पावसाळा सुरु असल्याने विविध आजाराचे रुग्ण आढळत असून त्यांना योग्य पध्दतीने सहकार्य करण्याच्या सुचना यावेळी दिल्या. आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनीही आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.