रत्नागिरी:- कोकण रेल्वेचा एक कर्मचारी दुसर्या राज्यातून रत्नागिरीत येऊन कर्मचार्यांची बैठक घेऊन गेला. सध्या तो कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे दहा कर्मचार्यांची तपासणी करुन क्वारंटाईन करण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संबंधित कर्मचारी रत्नागिरीत परवानगी घेऊन दाखल झाला की नाही याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
या प्रकरणात रेल्वे कामगार सेनेने कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन कर्मचार्यांच्या भावना मांडल्या आहेत. तसेच संबंधित कर्मचारी हे टाळेबंदी असताना दुसर्या राज्यातून दाखल कसे झाले असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या या नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास केला होता. रत्नागिरीत रेल्वे अधिकार्यांसोबत बैठक घेतली होती. दुसर्या राज्यातून आलेल्या त्या प्रतिनिधीबाबत आरोग्य विभागाला कळविण्यात आले नाही, अशी तक्रारही करण्यात आली आहे. 22 जून 2020 रोजी आरआरएम कार्यालयात कोकण रेल्वेच्या काही लोकांशी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन पदाधिकारीही आले होते. ज्याने बैठक घेतली ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.