कोरोनामुळे रखडलेल्या 15 टक्के बदल्या होणार

रत्नागिरी:- कोरोनामुळे रखडलेल्या बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील त्या-त्या संवर्गातील 15 टक्के बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार आहे. बदल्यांमध्ये पात्र असलेल्यांना आता कसरत करावी लागणार आहे.

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया सुरु होते. कोविड 19 च्या संसर्गामुळे 2020-21 या वित्तीय वर्षात राज्याची कर व करेतर उत्पन्नातील अपेक्षित महसूली घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने विविध उपाययोजना विहित केल्या आहेत. त्यामध्ये बदल्यांची प्रक्रिया थांबविण्यात आली होती; मात्र नुकतीच शासनाने बदल्यांसाठी नवीन निकष जाहीर केले आहेत. त्यामध्ये विविध संवर्गातील 15 टक्के बदल्या करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. ही प्रक्रिया येत्या आठ दिवसात सुरु होणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळत आहेत. बदली प्रक्रियेत योग्य सन्मान मिळावा यादृष्टीने हालचाली सुरु होणार आहे. बदल्यांचे निकष अद्यापही जाहीर झालेले नसल्याने पुढील काही दिवसात जिल्हा परिषदेत येणार्‍यांची संख्या वाढणार आहे.