रनप कर्मचार्‍यांना विमा कवच; 39 अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट लाभ

रत्नागिरी:- कोरोना विषाणूशी लढणार्‍या रत्नागिरी पालिकेच्या 39 अधिकारी, कर्मचार्‍यांना 25 लाखाच्या विम्याचे कवच मिळाले आहे. नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या पुढाकारातून हा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. 

कर्मचार्‍यांचा विमा उतरविणारी रत्नागिरी पालिका राज्यातील पहिली पालिका असल्याचा दावा पालिकेने केला आहे. देशात आणि राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाशी लढणार्‍या आरोग्य, पोलिस, नर्स, आशा वर्कर्स हे कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. त्यांच्याबरोबर पालिकेचे अधिकारी, कर्मचारीही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यावर आहेत. त्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. पालिकेने एलआयसी या शासनमान्य कंपनीचा जीवन अमर टर्म इन्शुरन्स विमा उतरविला आहे. पालिकेतील 39 अधिकारी, कर्मचार्‍यांना या विम्याचे कवच मिळाले आहे. विम्याची रक्कम 25 लाख प्रती कर्मचारी,  आहे. कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत पालिकेमार्फत हे संरक्षण राहणार आहे. त्यासाठी पालिकेमार्फत प्रत्येक वर्षी 7 हजार 760 हप्ता भरण्यात येणारा आहे. याचा एकूण खर्च 2 लाख 99 हजार 130 रुपये एवढा आहे. 

कोरोना विषाणूबाबतचे कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्ग  होऊन मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचार्‍यांना रक्कम 25 लाखाचे विमा कवच पुरविले जाणार आहे. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व कर्मचार्‍यांनी स्वागत केले आणि त्यांचे आभार व्यक्त केले. कर्मचार्‍यांचा विमा उतरवणारी रत्नागिरी पालिका राज्यातील पहिली पालिका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.