नव्या किटची प्रतीक्षा; आणखी काही दिवस लागण्याची शक्यता
रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्टिंग कीटबाबत अजूनही संभ्रमच आहे. रुग्णालयात सहा ते आठ दिवस पुरतील एवढी किट आहेत. नवीन किट येणार येणार असे सांगितले जात होते मात्र अद्यापपर्यंत टेस्टिंग किट आलेले नाहीत. नवीन किट मागविण्यासाठी रितसर निविदा काढून ही प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यात काही दिवस जाणार असल्याने जिल्हा रुग्णालयात अजूनही टेस्टिंग किटचा तुटवडा आहे. रुग्णालय प्रशासनाने याला दुजोरा दिला.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही वाढले आहे. नवीन टेस्टिंग कीट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियेमध्ये अडकल्याची माहिती पुढे आली आहे. आठ दिवस पुरतील एवढीच कीट जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. ज्या एजन्सीकडून कीट घेतले होते, त्याचे 45 लाख रुपये देणे असल्याचे समजते. त्याबाबत पालकमंत्री अनिल परब यांनीही लक्ष घातले आहे. जर टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर उसनवारीवर कीट मागवावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र यावर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले होते की, किट कमी पडू देणार नाही. खरेदीसाठी 45 लाख रुपये जिल्हा नियोजनमधून मंजूर केले आहेत. कीट आणण्यासाठी एक ट्रक पाठविण्यात आला आहे. दोन दिवसात कीट येतील असा दावा केला होता. मात्र अजून जिल्हा रुग्णालयाला टेस्टिंग किट आलेले नाहीत. त्यासाठी रितसर निविदा काढुन ही प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याला काही दिवस जाणार असल्याने असल्याने जिल्हा रुग्णालयात अजूनही कीटचा तुटवडा आहेच.
जिल्हा रुग्णालयात आठ दिवस पुरतील एवढी कोरोना टेस्टिंग कीट आहेत. नवीन कीट साठी रितसर निविदा प्रक्रिया करावी लागणार आहे. ती लवकरच पुर्ण होईल अशी माहिती डॉ. संगमित्रा फुले प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.