आधीच कोरोना महामारी त्यात सक्तीच्या दंड वसुलीने रत्नागिरीकर हैराण

रत्नागिरी:- हेल्मेट सक्तीसाठी विक्रमी दंड वसूल करणारी वाहतूक शाखा कारवाईच्यादृष्टीने अजूनही समाधानी नाही. कारवाईसाठी वरिष्ठांनी कर्मचार्‍यांना सूचना दिल्याचे समजते. मात्र या महामारीत भरडला जातो तो पोलिस कर्मचारी आणि नागरिक. कारवाई करताना पोलिस थेट नागरिकांच्या संपर्कात येतात. तर नागरिक कोरोना महामारीने हैराण आहेत आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. त्यात या सक्तीच्या वसुलीने वाहतूक पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी यापूर्वीच वाहतूक पोलिसांच्या हेल्मेटविरोधातील कारवाईबाबत जाहीर वक्तव्य केले होते. हेल्मेट सक्ती ही एकच कारवाई वाहतूक नियमांमध्ये आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. मात्र आता कहरच झाला आहे. हेल्मेट न वापरल्यास 500 रुपये दंड होता. मात्र आता डबलशीटला सुद्धा 500 रुपये दंड केला जात आहे. वाहतूक शाखेची ही जूलमी कारवाई असल्याचे वाहनधारकांचे मत आहे. वाहतूक नियम वाहनधारकांनी पाळले पाहिजेत यात दुमत नाही. यापूर्वी तशा कारवाया झाल्या आहेत. मात्र कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी चार महिने लॉकडाऊन सुरू आहे. नागरिक महामारीमुळे हैराण आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आहेत. बहुतेकजण बेरोजगार झाले असून जे कामवर आहेत त्यांच्या पगारांमध्ये कपात करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर पडणार्‍यावर पोलिसांनी कोरोना योद्धा म्हणून केलेली कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल पोलिस दलात त्यांची वाह..वाह झालीच. मात्र नागरिक आर्थिक संकटात असताना हेल्मेट सक्तीसाठी होणारी दंडात्मक कारवाई ही जुलमी असल्याचा आरोप आता वाहनधारक करू लागले आहे. तीन महिन्यामध्ये कोट्यवधीचा दंड वसूल करणार्‍या वाहतूक शाखा अजूनही वाहनधारकांवरील कारवाईत समाधानी नाहीत. कोरोनाचा संसर्ग एवढ्या जोमाने पसरू लागला आहे, की कोणाच्याही थेट संपर्कात येण्यास कोणी धजावत नाहीत. त्यात पावसाचे दिवस, आर्थिक अडचण या सर्वांचा विचार करून वाहतूक पोलिसांनी नागरिक म्हणूनही विचार करण्याची गरज आहे.