लॉकडाउनचा फटका; आठ नद्यांवरील पुररेषा निश्चिती रखडली

रत्नागिरी:- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूररेषेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. 100 वर्षांमध्ये आलेल्या सर्वांत मोठ्या पुराचा आधार घेऊन ‘रेड लाईन’ तर ब्ल्यू लाईनसाठी 25 वर्षांमध्ये आलेल्या सर्वांत मोठ्या पुराचा आधार घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 8 नद्यांवर पूररेषा निश्‍चित केली जाणार आहे. सर्व्हे झाला असला तरी प्रत्यक्ष आखणी (मार्किंग) होणार होती, मात्र लॉकडाउनमुळे जीवितहानी आणि नुकसानीच्याअनुषंगाने महत्त्वाच्या काम खो मिळाला आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात व इतर जिल्हे वगळता कोकणातच पूररेषेचे काम झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून पाटबंधारे विभागाकडून याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू झाली. पावसाळ्यात ज्या भागात पूरस्थिती निर्माण होते, त्या भागाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यासाठी पुणे येथील एक एजन्सी निश्‍चित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 197 गावे बाधित होत असून या गावांमध्ये पाण्याच्या पातळीनुसार रेड, ब्लू अशी पूररेषा निश्‍चित करण्यात येणार आहे. रेड पूररेषेमध्ये कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसली तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या बांधकामांचे करायचे काय, असा न सुटणारा प्रश्‍न प्रशासनापुढे असणार आहे.

गेल्या 100 वर्षातील सर्वांत मोठा पुराची पातळी विचारात घेऊन रेड लाईन मारण्यात येणार आहे. 25 वर्षांच्या मोठ्या पुराचा विचार करून ब्ल्यू लाईन मारण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील कापशी नदी, गडनदी, बावनदी, शास्त्री नदी, सोनवी नदी, गडगडी नदी, वाशिष्ठी, जगबुडी या 8 नद्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पुराचा फटका बसणारी यातील 197 गावे आहेत. गावांमधील शाळा, मंदिरे, महावितरणचे विद्युत खांबावर याचे मार्किंग (खुणा) करण्यात येणार आहे. काही ठिकाणी दगड टाकून त्यावर मार्किंग करण्यात येणार आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक्ष रेषा आणखीचे काम केले जाणार होते. मात्र लॉकडाउमुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे पुररेषा मार्किंगच्या कामाला कोरोनामुळे खो मिळाला आहे.