रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मंगळवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात मागील चोवीस तासात 14.27 च्या सरासरीने केवळ 128 मिमी पावसाची नोंद झाली असली तरी मंगळवार सकाळपासून पावसाने तुफान हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते. पावसाचा जोर आणि समुद्राला दुपारी आलेल्या भरतीने किनारपट्टी भागात भरतीचे पाणी घुसले होते. मिऱ्या, काळबादेवी आदी भागात उधाणाच्या लाटांचे तांडव सुरू झाले असून पुढील काही कालावधी किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू असणार आहे.