कोविड रुग्णालयात 32 तान्हुल्यांची कोरोनावर मात

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालय म्हणजे कोरोनाचे फैलावाचे केंद्र असा लोकांचा समज होत चालला होता. परंतु मंगळवारी एका बातमीने भीतीचे वातावरण दूर होऊन दिलासा मिळाला. 100 दिवसात येथे उपचार घेणार्‍या तब्बल 32 बालकांनी कोरोनावर मात केल्याने ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे आणि त्यांच्या टीमने आनंद व्यक्त केला आहे. ही बातमी कोरोनाविरुध्द जोरदार लढा देणार्‍या सिव्हीलच्या डॉक्टरांचे मनोबल वाढवणारी मानली जात आहे.
 

दरम्यान मंगळवारी कोरोनावर मात केलेल्या 2 नवजात बालकांसह 2 मातांवर पुष्पवृष्टी करून अनोख्या पद्धतीने त्यांना निरोप देण्यात आला. रत्नागिरीत कोरोनामुळे बालमृत्यूचा दर शून्य टक्क्यावर आहे. बालकांना आईचे दूध हे अमृत ठरले आहे. आईच्या दुधामुळे कोरोना झालेल्या बालकांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर योग्यवेळी लसीकरण त्याचबरोबर लहान बाळांमध्ये चांगली इम्युनिटी सिस्टिम कार्यरत असते. त्यामुळेच कोरोनाने बालमृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.