कोरोना डिटेक्शनसाठी आरोग्य सेतू अॅप वापरावर भर

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा मास्टर प्लॅन 

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर ग्रामीण भागात प्रत्येक आरोग्य केंद्रात कोविड आणि नॉनकोविडसाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणुक केली आहे. तसेच कोरोना रुग्ण, हॉटस्पॉट शोध घेण्यासाठी सेतू अ‍ॅप प्रत्येकाकडे असावे यादृष्टीने आरोग्य विभाग प्रचार करत आहे. आतापर्यंत सव्वा लाख लोकांकडे सेतू अ‍ॅप आहे. सर्दी, ताप, खोकला, दमा असलेल्या रुग्णांची शोध मोहिम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे. जिल्ह्यात 67 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रात दोन डॉक्टर आणि पुरेसा स्टाप उपलब्ध आहे. उपलब्ध वैद्यकीय अधिकार्‍यांपैकी एक वैद्यकीय अधिकारी कोविडसाठी नेमण्यात आला आहे. दुसरा डॉक्टर गावातून येणार्‍या विविध अन्य आजारांचे रुग्ण तपासण्यासाठी नेमण्यात आलेला आहे. यामध्ये टाईफाईल, मलेरिया, डेंग्यु यासारख्या तपासणी करत आहेत. दोन्ही प्रकारच्या आजारांना सामोरे जाण्यासाठी गावपातळीवर आरोग्य विभाग सज्ज आहे. गेल्या तीन महिन्यात चांगल्या पध्दतीने नियोजन सुरु असुन डॉक्टर, कर्मचारी योग्य काळजी घेत काम करत आहेत.

त्यांना पुरेसा साहित्य पाठविण्यात आले आहे.
कोरोना रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत असून प्रशासन तेथील गाव, वाडी विषाणू बाधित विभाग (कंटेनमेंट झोन) म्हणून जाहीर करत आहे. त्या भागातील लोकांची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य पथकांकडे दिली जाते. त्यासाठी सर्वच आरोग्य कर्मचारी कार्यरत असतात. त्याचबरोबर कंटेनमेंट झोन नसलेल्या विभागातील पन्नास घरांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी आरोग्य, आशा, अंगणवाडी सेविकांकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना भेटी देऊन त्यांची माहिती एकत्रित केली जात आहे. कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप प्रत्येकाने डाऊनलोड करण्याच्या सुचना आरोग्य विभागाचे कर्मचारी करत आहेत. कंटेनमेंट झोनमधील लोकांसाठी ते अत्यावश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सव्वा लाख लोकांनी सेतू अ‍ॅप घेतले आहे. या माध्यमातून हॉटस्पॉट कोणते ते समजते. तसेच जवळून एखादा पॉझिटीव्ह गेला तर त्याचीही माहिती मिळते. आपण हायरिस्क, लोकांच्या जवळ आहोत का हे त्या अ‍ॅपवरुन कळते. कोरोनाशी निगडीत आजार असतील तर त्याची माहिती घेण्यासाठी अ‍ॅपवर हेल्पलाईन नंबरही आहेत. अ‍ॅप संगळ्यानी घेतले तर हॉटस्पॉटची माहिती मिळणे शक्य होईल. जिल्ह्याची लोकसंख्या 16 लाख असून त्यातील पन्नास टक्के लोक अ‍ॅड्रॉईड मोबाईल वापरत असतील. त्या सगळ्यांकडे हे अ‍ॅप असावे यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. कोविडबरोबरच सारी सर्व्हिलन्सही गावागावात सुरु आहे. यामध्ये ताप, खोकला दमा यासारखे आजार असलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. त्या रुग्णांकडे जास्त लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सुरु आहे.

निसर्ग चक्रीवादळानंतर दापाली, मंडणगड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या परिसरात साथींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरोघरी मेडिक्लोरचे वाटप केले गेले. गावातील आशा, अंगणवाडी सेविकांकडे आवश्यक औषध साठा दिला गेला. मलेरिया, डेंगुची साथ पसरू नये यासाठी स्वच्छतेवर भर दिला गेला आहे. ग्रामपंचायतीमार्फत किनारी भागात साफसफाई सुरु आहे. हर्णैमध्ये वर्षभरापुर्वी साथ रोग उद्भवला होता. ते धोकादायक गावांमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी स्वतः पाहणी केली असे डॉ. कमलापुरकर यांनी सांगितले.