उधाण; मिऱ्या पंधरामाड येथील बंधारा समुद्राकडून गिळंकृत

किनारपट्टीवरील माड कोसळले, ग्रामस्थ भयभीत 

रत्नागिरी:- मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे ढासळत चाललेला मिऱ्या पंधरामाड येथील बंधारा वाहून गेला आहे. किनाऱ्यालगतचे नारळाचे झाडही पाण्यात गायब झाले आहे. किनाऱ्यालगतच्या आणखी झाडांना धोका असून पावसाचा जोर वाढत असल्याने किनाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. येणाऱ्या अमावस्येपूर्वी येथे उपाययोजना न केल्यास मोठा धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 
 

किनारपट्टी भागात सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आले. सोमवारी दुपारच्या सुमारास समुद्राला भरती आली आली होती. आज सकाळपासून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे उधाणाच्या लाटांचा जोरही वाढलेला आहे. अजस्त्र लाटा किनाऱ्या वरील भागात फुटत आहेत. उधाणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा मिऱ्या किनारपट्टीला बसला. मिऱ्या येथील पंधरामाड धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला उधाणाच्या भरतीचा तडाखा बसला आहे. येथील मोरेवाडी येथे राहणाऱ्या सावंत यांच्या बागेचे नुकसान झाले आहे  या परिसरातील बंधारा वाहून गेला असून किनाऱ्यावरील एक नारळाच झाड लाटांच्या माऱ्याने पडलं आहे. दुसरं झाडही पडण्याची शक्यता आहे. लाटांचा पाणी घराच्या परिसरात येऊ लागले आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. उधाणाच्या लाटांनी धुप प्रतिबंधक बंधाऱ्याचे दगड समुद्राने गिळंकृत केले असून बंधार्‍याला मोठे भगदाड पडलं आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर या भागाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.  

दरम्यान,  किनारपट्टी भागातील काळबादेवी, साखरतर, गावखडी, आरे, नेवरे, गणपतीपुळे, जयगड आदी भागात किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळत होत्या. सलग दुसऱ्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या पाण्याने काही प्रमाणात रहिवासी भागात प्रवेश केल्याने ग्रामस्थांच्या उरात धडकी भरली होती.