रत्नागिरी:- रत्नागिरीत बँक अधिकाऱ्याच्या आत्महत्येने सोमवारी एकच खळबळ उडाली. संजय तुकाराम सावंत (46) असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत सोमवारी सकाळ पासून बेपत्ता होते. सोमवारी दुपारी भाट्ये पुलानजीक अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला होता. अधिक शोध घेतला असता दुपारी मांडवी किनाऱ्यानजिक सावंत यांचा मृतदेह आढळून आला.
संजय सावंत जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात कर्ज विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. सोमवारी सकाळ पासून संजय सावंत बेपत्ता होते. त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. त्यांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघड झाली. दुपारी त्यांचा मृतदेह मांडवी समुद्र किनारी सापडला. स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली होती.
सावर्डे भुवडवाडी येथील संजय सावंत हे कर्ला-आंबेशेत येथे वास्तव्याला होते. गेल्या सहा वर्षांपासून ते कर्ज विभागात उपव्यवस्थापक सेवेत होते. संजय सावंत यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाईकांसह जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदींनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती. संजय सावंत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.