पंधरामाड येथे बंधाऱ्याला उधाणाचा दणका;बंधाऱ्याचे दगड गेले वाहून

रत्नागिरी:- सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड येथील धुप प्रतिबंधक बंधाऱ्याला दणका दिला. भरतीवेळी समुद्रात उसळणाऱ्या उधाणाच्या लाटा मिऱ्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन आदळत होत्या. लाटांच्या तडाख्याने पंधरामाड येथील बंधाऱ्याचे दगड ढासळले. यामुळे किनाऱ्यानजिकच्या दोन माड वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 

किनारपट्टी भागात सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आले. सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास समुद्राला भरती आली. किनारपट्टी भागातील काळबादेवी, साखरतर, गावखडी, आरे, नेवरे, गणपतीपुळे, जयगड आदी भागात किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा येऊन आदळत होत्या. सलग दुसऱ्या दिवशी समुद्राच्या भरतीच्या पाण्याने काही प्रमाणात रहिवासी भागात प्रवेश केल्याने ग्रामस्थांच्या उरात धडकी भरली होती. 
 

उधाणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा मिऱ्या किनारपट्टीला बसला. मिऱ्या येथील पंधरामाड धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला उधाणाच्या भरतीचा तडाखा बसला. येथील मोरेवाडी येथे राहणाऱ्या सावन्त यांच्या बागेचे काही प्रमाणात नुकसान झाले. उधाणाच्या लाटांनी धुप प्रतिबंधक बंधाऱ्याचे दगड समुद्राने गिळंकृत केले. यामुळे किनाऱ्यालगतचे दोन माड समुद्रात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. येणाऱ्या पावसाच्या कालावधीत या भागाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.