उधाणाच्या लाटा थेट गणपतीपुळे मंदिरापर्यंत

रत्नागिरी:- समुद्राच्या उधाणाने तालुक्यातील किनारी भागाला तडाखा दिला. सोमवारी गणपतीपुळे देवस्थान मंदिराच्या संरक्षण कठड्यावर अजस्र लाटा आदळून पाणी सुमारे साडे तीन मीटर उंच उसळत होते. पाणी थेट मंदिरापर्यंत येत होते. समुद्राचे पाणी थेट श्रींच्या चरणी येण्याचा अद्भुत नजारा गणपतीपुळे वासीयांनी पाहिला. 

यंदाच्या पावसाळी हंगामामध्ये समुद्राच्या उधाणाच्या भरतीने किनारी भागामध्ये मोठे तांडव घातले. सलग तीन दिवस उधाण आल्याने मिर्‍या येथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याची मोठी धूप झाली. उधाणाचा फटका प्रथमच तालुक्यातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिराला बसला. समुद्राच्या अजस्र लाटा मंदिराच्या संरक्षण भिंतीवर येऊन आदळत होत्या. जवळपास अर्धातास अधिक हा नजरा सुरू होता. लाटांचा वेग असल्याने लाटांचे हे पाणी सुमारे साडे तीन मीटर उंच उठत होते. समुद्राचे आक्राळविक्राळ रूप पाहून अनेकांनी तोंडात बोट घातले.