बागा सफाईसह पुनःलागवडीसाठी अर्थसाह्य द्या

नारळ बोर्डाची केंद्राला शिफारस; नारळ बागायतदारांचे अगणित नुकसान

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह श्रीवर्धनमधील सुमारे 2720 हेक्टर नारळ बागांचे नुकसान झाले आहे. ते भरुन काढण्यासाठी बागायतदारांना आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. सुरवातीला बागा सफाईसाठी मोफत इंधन आणि पुनःलागवडीसाठी हायब्रीड जातीची नारळ रोप मोफत उपलब्ध करुन दिली जावीत अशी शिफारस केंद्रीय नारळ बोर्ड समितीने केंद्र शासनाकडे केली आहे.

जुन महिन्यात पहिल्याच दिवशी आलेल्या चक्रीवादळाने रत्नागिरी, रायगड या दोन्ही जिल्ह्याला तडाखा दिला. त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, गुहागर या तिन तालुक्यांना बसला. रायगडमध्ये श्रीवर्धन तालुका सर्वाधिक बाधित झाला. घरांसह नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागायतीही उध्वस्त झालेल्या आहेत. शासनाकडून याचे पंचनामे करण्यात आले. त्यापाठोपाठ केंद्रीय समितीनेही पाहणी केली. या तालुक्यात नारळाची लागवड मोठ्याप्रमात केली जाते. त्यामुळे केंद्रीय नारळ बोर्डाच्या समितीचा विशेष दौरा या दोन्ही जिल्ह्यात झाला. यामध्ये केंद्रीय नारळ बोर्डाच्या समितीचे सदस्य म्हणून भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख वैभव शिंदे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही भागातील 85 टक्के नारळ बागायती उध्वस्त झालेल्या आहेत. यामध्ये 2720 हेक्टरवरील नारळाची 4 लाख 77 हजार झाडे जमिनदोस्त झाली आहेत. रायगडमधील श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगर आणि तळा गावात सर्वाधिक नुकसान झालेले आहे. या समितीने नारळ बागायतदारांना मदत करण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. अनेकांच्या बागांमधील उध्वस्त झाडे साफसफाई करण्यासाठी आवश्यक यंत्रे, इंधन उपलब्ध करुन दिले पाहीजे. बागा पुनरुज्जीवन करुन बागायतदारांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी पावले उचलली पाहीजेत. त्यासाठी बागांची सफाई आवश्यक आहे. नारळाची हायब्रीड जातीची रोपे या बागायतदारांना दिली तर त्यातून लवकर उत्पन्न मिळणे शक्य आहे. त्यासाठी ही रोपे शासनाच्या योजनेतून मोफत दिली पाहीजेत. सध्या येथील लोकांना आर्थिक हातभाराची गरज असल्याचे अहवालात नमुद केले आहे.