रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयातील तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नर्स आणि ब्रदरचा समावेश आहे. या रुग्णांच्या संपर्कात रुग्णालयातील अनेकजण आले असून या लोकांना क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात ड्युटी करायची कुणी? अशी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात नव्याने पाच रुग्ण सापडले असून यापैकी तिघेजण जिल्हा रुग्णालयातील स्टाफ आहे. या तिघाजणांचा रुग्णालयातील अनेक कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासोबत थेट संपर्क आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केल्यास जिल्हा रुग्णालयात ड्युटी करायची कुणी असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान सापडलेले तिघा कर्मचाऱ्यांमध्ये एकजण निवखोल, एकजण नाचणे गोडावून आणि एक चर्च रोड येथील आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नवे रुग्ण सापडल्याने कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सातशे पार तर ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा दोनशे पार गेला आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 8 जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे.