रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात कोरोनाने दोघांचे बळी घेतले आहेत. दापोली तालुक्यातील दाभोळ आणि आंजर्ले या दोन ठिकाणी कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या दोन रुग्णांपैकी एक कोविड योद्धा असून आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सहाय्यकाचे रविवारी दुपारी कोरोनाने निधन झाले.
यापूर्वी दाभोळ, ता. दापोली येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. रुग्णांचे वय 60 वर्षे होते. रुग्णाला मधुमेह, ब्लड प्रेशर तसेच एकदा हृदय विकारचा झटका येऊन गेला होता. रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी झाला होता. त्याचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान रविवारी दुपारी दापोली तालुक्यातील आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सहाय्यक यांचा कोरोनाने बळी घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यू सदृश्य रोगाची लागण झाली होती. यात त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी झपाट्याने कमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात 30 जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. परंतु रविवारी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.