ना. उदय सामंत; विरोधक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप
रत्नागिरी:- चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे आणि राजकारण करण्याचे काम काहीजण करत आहेत. पण आम्ही चार ते पाच टर्म आमदार म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि मी एकत्र काम करत आहोत. वाद लावण्यासाठी बालीश टिका कोणी करु नयेत, अशी टिका करतानाच कोकणातील वादळग्रस्तांसाठी शेल्टर योजना मंजूर झाल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, रत्नागिरी, सिंधूदूर्ग आणि रायगड जिल्ह्यात फळबागायतीदारांना सर्वाधिक फायदा मिळवून देण्याकरीता 1992 ची रोजगार हमी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वादळामध्ये अनेक झाडांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे रोहयोच्या जुन्या निकषात बदल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यासह बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. विरोधकांकडून खाजगी रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्याचा आग्रह धरला जात होता. मात्र सर्वसामान्यांचा आणि भविष्याचा विचार करुन आम्ही शासकिय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी आरोपासाठी आरोप करु नयेत. आजच्या घडीला मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी काम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पालकमंत्री परब साहेब आणि मी एकत्र काम करतोय. वायफळ प्रतिक्रिया व्यक्त करुन आमच्यामध्ये वाद लावण्याचा केवळ बालिशपणा आहे. आम्ही एकत्र येऊन काम करतो. विरोधकांना काळजी करण्याचे काही कारण नाही.
उदय सामंत सिंधुदुर्गचे पालकमंत्री असले तरीही आम्ही जबाबदारी वाटून घेतलेली आहे. ते कोकणात राहून इथे संपर्कात आहेत. मुंबईतून जी मदत लागते ती मी करत असतो. कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विरोधकांच्या बोलण्यावरुन मी विचलीत होणार नाही. केबीनमध्ये एसीत बसून आरोप करणे सोपे आहे. आमनसामने या मग बघूयात कोण किती मदत करते ते, असे सांगत अॅड. परब यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नसल्याच्या विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले.