अजस्त्र लाटांचा मारा ; रहिवाशांमध्ये घबराट
रत्नागिरी:- समुद्राच्या उधाणाने पुन्हा एकदा मिर्या बंधार्याला दणका दिला आहे. पांढरा समुद्राच्या पुढील भाग अजस्र लाटांमुळे वाहून गेल्याने भगदाड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासनाने समुद्राच्या उधाणाचा विचार करून तत्काळ दुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
मिर्या बंधार्याचे दुखणे थांबता थांबेना. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पाऊस पडत आहे. यात समुद्राच्या उधाणामुळे मिर्या बंधार्यावर अजस्र लाटा आदळत आहेत. यापूर्वीच पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये सुमारे साडेतीन किमीच्या मिर्या बंधार्याला पावसाळ्यात सात ठिकाणी धोका असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्याच्या दुरुस्तीला सुमारे 98 लाख रुपये खर्च असल्याचे अंदाजपत्र त्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केले आहे. मात्र त्याला अजून प्रशासकीय मंजूरी न मिळाल्याने हे काम थांबले आहे. मात्र आमवस्येच्या भरतीला वाहून गेलेल्या बंधार्याच्या दुरुस्तीचे काम झाले आहे.
दोन दिवसाच्या उधाणाच्या भरतीमुळे पांढरा समुद्रापासून काही अंतरावर असलेला धुपप्रतिबंधक बंधारा लाटांनी गिळंकृत केला आहे. मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. त्यामुळे या उधाणाच्या भरतीने पुन्हा या भागाला भगदाड पडण्याची शक्यता आहे. बंधार्याची वारंवार होणारी धुप रहिवाशांच्या चिंतेचे कारण बनले आहे. प्रशासनाने तत्काळ धुप झालेल्या भागाची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.