लॉकडाऊननंतर नवीन उद्योग सुरू करण्याकडे तरुणांचा कल


आत्मनिर्भर’साठी जिल्हा उद्योग केंद्राकडे 345 प्रस्ताव

प्रणील पाटील :-कोरोनाने अर्थव्यवस्थेला मोठा झटका दिला. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या लॉकडाऊनमुळे तरुणांना आत्मनिर्भर बनण्याचा नवा मंत्र मिळाला. जिल्ह्यातील तरुण उद्योगाकडे वळू लागल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 345 प्रस्ताव नवीन उद्योग सुरु करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे आले आहे. गतवर्षी पहिल्या तीन महिन्यात 210 प्रस्ताव आले होते. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर अनेकांनी विविध उद्योगांसाठी कर्ज मिळावे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केले आहेत.

सुशिक्षित बेरोजगारांना आधार देण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या दोन योजनांद्वारे 15 ते 45 टक्के सबसिडीवर कर्ज पुरवठा होतो. दरवर्षी सुमारे 40 कोटी रुपयांचे कर्ज उद्योगांसाठी पुरवण्यात येते. यंदा कोरोनामुळे त्यात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पूर्णतः टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर पुढील तीन महिन्यात रोजगार नसल्यामुळे मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. गावागावात आलेल्या तरुण नव्याने रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. नव्याने उभारी घेण्यासाठी तरुण वर्ग ‘आत्मनिर्भर’ बनू पाहत आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज घेऊन फुड प्रकिया उद्योग, इंजिअरिंग फॅब्रीकेटस्सह विविध छोटे-मोठे उद्योग सुरु करण्याकडे कल आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल, मे, जुन या तिन महिन्यात म्हणजेच कोरोना कालावधीत 345 जणांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव सादर केले आहेत. गतवर्षी याच तिमाहीत दोनशेच प्रस्ताव होते. यंदा त्यात झालेली वाढ ही लक्षणीय असून पुढील नऊ महिन्यात हजारो प्रस्ताव येतील असे चित्र आहे. त्यादृष्टीने उद्योग केंद्राने नियोजन केले आहे. यंदा 1200 हून अधिक प्रस्ताव यावेत असे आवाहन केले आहे. गतवर्षी दिलेल्या कर्जापैकी एनपीएचे प्रमाण अत्यंत कमी आहे. उद्योजकाकडून प्रस्ताव आल्यानंतर संबंधितांना बारा दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. व्यवस्थापन, मार्केटींग याचे मार्गदर्शन केले जाते. गेल्या वर्षाभरात अडीचशेहून अधिक लोकांना रोजगारासाठी कर्ज देण्यात आले. त्यातील महिलांचा सहभाग 60 टक्के आहे. यंदाही तिच परिस्थिती असून महिला बचत गटांकडून रोजगारासाठी कर्ज घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा

बेरोजगारांची फसवणूक टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विशेष सेलची स्थापना केली आहे. एका कर्मचार्‍याची नेमणूक केली असून ती व्यक्ती अर्ज भरणा करते. उमेदवारांनी अन्य कोणत्याही एजंटची मदत घेऊ नये असे आवाहनही उद्योग केंद्राकडून केले आहे.