जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस; पुराचा धोका, सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी:- वेगवान वार्‍यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. ठिकठिकाणी पाणी भरले असून तुळशी घाटात दरड कोसळली. सर्वच मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. चिपळूण, मंडणगड, संगमेश्‍वरातील सर्वच मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. समुद्र खवळल्यामुळे अजस्त्र लाटा किनार्‍यावर उसळत आहेत. हवामान विभागाने किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शनिवारी (ता. 4) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 45.12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 0.80, दापोली 48, खेड 29.90, गुहागर 82, चिपळूण 41.40, संगमेश्‍वर 31.30, रत्नागिरी 59, लांजा 53.10, राजापूर 60.60 मिमी नोंद झाली आहे. गुजरात आणि लगतच्या परिसरातील हवामान बदलासह अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर शनिवारी दिवसभर कायम होता. मंडणगड तालुक्यातील भारजा, निवळी या नद्या तुडुंब भरून वाहत आहे. उमरोली-शिपोशी मार्गावर तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. शहर परिसरात पावसाचे पाणी साचले असून काहींच्या घरांना धोका निर्माण झालेला होता.

चिपळूणमध्ये परशुराम नगरात पावसाचे पाणी साचून ते घरात घुसले आहे. खेर्डी परिसरातही पाणी साचलेले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. पावसाचे पाणी मोर्‍यांमध्ये साचून राहिल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवरही होते. राजापूरातही ही परिस्थिती आहे. अर्जुना नदीही दुथडी भरुन वाहत आहे. रत्नागिरीतील काजळी नदीचे पाणी वाढले असून पावसाचा जोर कायम राहीला तर पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. संगमेश्‍वर तालुक्यातील सोनवी, बावनदी, असावी, शास्त्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या भातशेतीत पाणी घुसले होते. काही ठिकाणी नदीचे प्रवाहही बदलत आहेत. नदीकिनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भात लावणीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी राजाला पावसाने दिलासा दिल्याने भात लावण्यांचा जोर वाढला आहे.