खास बाब म्हणून रत्नागिरीत मेडिकल कॉलेज

ना. उदय सामंत; महिनाभरात प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना 

रत्नागिरी:- ब्रेक द चेन नावाखाली सुरू असलेल्या लॉकडाऊनवर टीका करणार्‍या भाजप नेत्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले असून टाळ्या वाजवून, दिवे लावून कोरोना गेला नाही. मात्र ब्रेक द चेन या नावाखाली लागू केलेला लॉकडाऊन हा जनतेच्या हितासाठी असल्याचे सांगत सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला असून रत्नागिरी जिल्ह्यात विशेष बाब म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली. रत्नागिरी येथे आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आहे. ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे काळजी घेणे सर्वांचे काम आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलून दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या अधिकारात लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. संसर्गाची साखळी तुटावी हाच मुख्य हेतू असल्याचे सांगून लॉकडाऊन घोषित करण्याचे अधिकार मंत्र्यांना नाहीत असे सांगून टीका करणार्‍यांना थेट उत्तर दिले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईत मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत चार निर्णय रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी झाले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे अशी मागणी होत होती. आजच्या बैठकीसाठी खा. विनायक राऊत यांच्यासह सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आम. वैभव नाईक आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजसंदर्भात ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. लवकरच त्यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. १५० खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव येत्या महिनाभरात शासनाकडे जाईल. जी न्यासाची जागा आहे ती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर होत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव प्रलंबित राहील. मात्र याबाबत सर्व कार्यवाही सुरू झाली आहे. येत्या दोन-तीन महिन्यातच सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा होईल असे ना. सामंत यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याबाबत बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात खास बाब म्हणून वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी आयुष विभागाचे अध्यक्ष तात्यासाहेब लहाने यांनी केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी लहाने यांच्याकडे पाठवतील. याबाबतचा पत्रव्यवहार तात्यासाहेब लहाने यांनी केंद्राकडे केला आहे. त्याला पर्याय म्हणून शासन मेडिकल कॉलेज सुरू करू शकते असेदेखील सूचविले आहे. त्यामुळे खास बाब म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू होईल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.