रत्नागिरी:- रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला असला तरी अधून-मधून कोसळणाऱया जोरदार सरींनी रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी नदीला आलेल्या प्रचंड पूराचे पाणी लगतच्या शेतात घुसून त्यात लावणी केलेली भातशेतीच वाहून गेली आहे.
गेल्या आठवडाभराहून अधिक काळ पावसाने दडी असतानाही पाणथळीच्या शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ गावात देखील नदीलगतच्या भागात तेथील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात भातशेतीची लावणी नुकतीच करून ठेवली होती. सोमवारी सायंकाळनंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला.
त्यामुळे तेथील नदीला मोठा पूर आला होता. दुथडी भरून वाहणार्या नदीने आपल्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने पूराचे पाणी लगतच्या शेतांमध्ये घुसले. त्यामुळे लावणी केलेली भातशेतीच वाहून गेली. तर पूराच्या पाण्यामुळे दगड-धोंड्यांचा प्रचंड गाळ सुपिक शेतीत येऊन साचल्याने तेथील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनस्तरावर या झालेल्या नुकसानीची दखल घेतली जावी अशी तेथील शेतकर्यांमधून मागणी होत आहे.