रत्नागिरी:- लालबागच्या राजाच्या धर्तीवर रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील श्री रत्नगिरीचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव रद्द करून गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधाकरीता काम करण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
लालबागच्या राजाच्या धर्तीवर रत्नागिरीत मारुती मंदिर सर्कल येथे श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाविकांनी देखील या उत्सवाला प्रतिसाद दिला. रत्नागिरीच्या राजा बद्दल मागील अनेक वर्षे रत्नागिरीकारांच्या मनात अफाट श्रद्धा निर्माण झाली होती.
मात्र सध्या कोरोनाच्या कालावधीत लालबागचा राजा मंडळाने यावर्षी मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर श्री रत्नागिरीचा राजा मंडळाने देखील यावर्षी मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली. गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधाकरीता मंडळाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येतील असे ते म्हणाले.