तिवरेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मिऱ्या बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू करा


भाजप तालुकाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांची मागणी

रत्नागिरी:- मिर्‍या बंधार्‍याची सात ठिकाणी झीज झाल्याने तेथील रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गावातील लोक जीव मुठीत धरून राहात आहेत. दुर्लक्ष झाल्यामुळेच चिपळूण येथील तिवरे धरण फुटुन निष्पाप लोकांचा जीव गमावावा लागला. अशी परिस्थिती येथे निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनानाने 98 लाखाच्या कामाला तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

मिर्‍या गावातील ग्रामस्थांची घरे समुद्रापासून जवळ आहे. समुद्राला उधाण आल्यावर लांटांचे पाणी लोकांच्या घरात घुसू नये, याच्या संरक्षणासाठी मिर्‍या बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र या बंधार्‍याची सात ठिकाणी  झीज झाली  आहे. त्याची दुरुस्ती वेळीच होणे आवश्यक आहे. हा बंधारा नादुरुस्त झाल्याने येथील गावातील लोकांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा प्रत्यय जून महिन्यामध्ये निसर्ग वादळामध्ये येथील ग्रामस्थांनी अनुभवला आहे. या बंधार्‍याच्या दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्र प्रशासकीय मान्यतेसाठी जानेवारी 2020 मध्ये पतन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले. या बंधार्‍यामुळे दुरूस्तीसाठी 98 लाख रुपयांची गरज असल्याचे पत्रानुसार दिसून आले. त्यानंतर मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठक झाली मात्र अद्यापही या कामाला प्रशासकीय मान्यात दिलेली नाही. त्यांनी प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या.  मात्र जोपर्यंत समिती बैठक होत नाही. तोपर्यं प्रस्तावास मंजूरी देता येणार नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी सांगितले, असे पतन विभागाने दिलेल्या पत्रानुसार स्पष्ट झाले. बंधार्‍याची झीज गावासाठी धोकादायक ठरत आहे. गावातील लोक स्वतःचा जीव मुठीत धरून राहात आहेत. त्यामुळे या कामाला तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.