जिल्हा परिषदेत 8 जुलैपर्यंत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे सुरक्षिततेसाठी इमारतीमध्ये 8 जुलैपर्यंत ‘व्हिजीटर्स्’साठी बंधने घालण्यात आली आहेत. विविध कामांसाठी ऑनलाईन किंवा दुरध्वनीवरुन संपर्क साधावा असे अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील एका मुख्य अधिकार्‍याचाही समावेश आहे. अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर सुरक्षिततेसाठी अध्यक्ष बने यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. संबंधित अधिकार्‍यांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाईन होण्याच्या सुचना दिल्या आहेत. तातडीने त्यांची तपासणीही केली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेची इमारत सॅनिटाईज करण्यात येणार आहे. त्यावर कार्यवाही सुरु झाली आहे. विविध विकासकामांसाठी जिल्ह्यातून शेकडो लोक जिल्हा परिषद इमारतीमध्ये येत असल्यामुळे सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर बंधने घालण्यात आलेली आहेत. सध्या जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत कडक टाळेबंदी सुरु आहे. त्यामुळे लोकांनीही जिल्हा परिषदेत येऊ नये अशा सुचना दिलेल्या आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभाग वगळता अन्य सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित 10 टक्केच ठेवण्यात आलेली आहे. जिल्हाभरातून येणारी टपाल सेवा मात्र सुरु असून त्यांच्यासाठी प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर आणि थर्मल तपासणीची व्यवस्था केलेली आहे, असे बने यांनी सांगितले.