रत्नागिरी:- देशभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना राज्यात देखील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. कोरोनासारख्या महामारीच्या विरोधात योग्य प्रकारे लढा देत असून अनेक संस्थांनी शासनाला मदतीचा हात दिला आहे. रत्नागिरी शहरातील परटवणे येथील श्री सत्यसेवा मंडळ यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. याबाबतचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी भडकमवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
राज्यात कोरोना महामारीचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. दर दिवशी वाढणारे रुग्ण यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिकच वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात अनेक संस्था त्याचबरोबर विविध खात्यातील सरकारी कर्मचारी हे रस्त्यावर उतरुन कोरोना विरोधात लढाई देत आहेत तर राज्य शासनाने देखील आपल्या कर्मचार्यांना योग्य ते सहकार्य आणि मदत दिली आहे. या महामारीचे संकटात अर्थव्यवस्था टिकून रहावी यासाठी अनेक संस्था, सामाजिक मंडळे, मंदिरे, मशिद आदीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भरघोस मदत करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर बुधवारी एकादशीच्या मुहूर्तावर श्री सत्यसेवा मंडळ परटवणे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १० हजार रुपयांची मदत करण्यात आली. त्याबाबतचा धनादेश मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरव, सरचिटणीस मोहन नाखरेकर यांच्या हस्ते उप निवासी जिल्हाधिकारी भडकमवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे खजिनदार अरविंद नागवेकर, सदस्य अजित शिंदे, प्रशांत पवार, रणजीत सावंत, रामदास पाटील आदी उपस्थित होते.