रत्नागिरीत वर्दळ थंडावली; लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंगळवारी जत्रेचे स्वरूप आलेल्या रत्नागिरीतील वर्दळ बुधवारी पूर्णतः थंडावली. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने रस्त्यावर होती. दूध, भाजीपाला आणि छोटी दुकाने सोडून बाकी सर्व बाजारपेठ पूर्णतः बंद होती.
 

जिल्ह्यात मागील काही कालावधी पासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. एकाएकी अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने रत्नागिरीकारांच्या चिंतेत भर पडली. रत्नागिरी शहरात रुग्ण सापडू लागल्याने प्रशासन देखील चिंतेत पडले. रुग्णसंख्या 600 पार गेल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 जुलै पासून 8 जुलैपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 
 

बुधवार पासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. व्यापारी महासंघाने देखील शंभर टक्के दुकाने बंद ठेवली. यामुळे रामआळी, मारुती आळी, गोखले नाका, लक्ष्मी चौक, मारुती मंदिर, साळवी स्टॉप आदी गजबजणारी ठिकाणे शांत होती. सायंकाळी पाच नंतर पूर्णतः वाहतूक बंद असणार आहे.