मारुती आळीतील इमारत मालकाला रनपकडून नोटीस

रत्नागिरी:- शहरातील मारुती आळीतील एका इमारत मालकाला नोटीस देऊन इमारत बांधकाम परवानगीबाबतच्या कागदपत्रांची मागणी रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. सात दिवसांत इमारत मालकाला ही कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मंदिरासमोरची ही इमारत अनधिकृत असल्याची तक्रार आल्यानंतर ही कार्यवाही झाली आहे. इतरही अशाच इमारतींची शोधमोहीम सुरू आहे.

कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आली आहे. रस्त्याला लागूनच असलेल्या या इमारतीत तीन व्यापारी गाळे असून वरचा माळा निवासी आहे. याबाबतची रत्नागिरी नगरपरिषदेकडे तक्रार आल्यानंतर त्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून सात दिवसांची नोटीस दिली असल्याचे बांधकाम विभागातील अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले. सात दिवसांत नोटीसला उत्तर न आल्यास पुढील कार्यवाही होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रनप बांधकाम विभागाने दिलेल्या नोटीसला उत्तर न दिल्यास किंवा परवानगीबाबतची अधिकृत कागदपत्रे सादर न केल्यास अधिनियम ५२,५३ नुसार दुसरी नोटीस दिली जाणार आहे. या नोटीसनुसार अनधिकृत बांधकाम इमारत मालकाने स्वखर्चाने पाडून घेण्यास सांगितले जाते. तरीही इमारत मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्यास इमारत रनपकडून पाडली जाऊन त्याचा खर्च संबंधित मालकाकडून वसुल केला जातो. ही सूचनाही ५२, ५३ च्या नोटीसमध्ये दिली जाते. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या अनेक बंधनांमुळे रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची कुणकुण रनपला लागली. त्यानुसार रनपने कामकाज सुरू झाल्यानंतर अशा बांधकामांची शोधमोहीम सुरू केली आहे. अनधिकृत इमारतींवर पाडण्याबाबतची कार्यवाही होते. त्याचबरोबर तिप्पट दराने घरपट्टी वसुल केली जाते. त्यामुळे मारूती आळीतील त्या इमारतीबाबत कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.