बहिणीचे आर्जव आणि भावाला वाचवण्यासाठी धावले रत्नागिरी पोलीस

रत्नागिरी:- थेट बारामतीवरून पोलीस कंट्रोल रूमला फोन…माझा भाऊ जीव देतोय…त्याला वाचवा…बहिणीचे रत्नागिरी पोलिसांकडे आर्जव आणि तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखायला पोलीस यंत्रणा धावली. मोबाईल लोकेशनद्वारे तरुणाचा माग काढत अखेर पोलिसांनी त्या तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखले. 

पोलीस कंट्रोल रूममधून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांचा नंबर घेऊन त्या युवतीने पोलीस निरीक्षक सासणे यांना फोन केला. फोन येताच त्यांनी तिला धीर देऊन लगेच तिच्याकडून तिच्या भावाचा मोबाईल आणि गाडी नंबर घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सासणे यांनी गुन्हे शाखेतील पोलीस नाईक रमिज शेख यांना तिच्या भावाचा मोबाईल ट्रेस करायला सांगितला. शेख यांनी काही क्षणातच मोबाईल अंजनवेल, गुहागर येथून दापोली-दाभोळ रोडला जात असल्याचे समजले. लगेच पोलीस निरीक्षक सासने यांनी  गुहागर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बोडके  आणि दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना कल्पना दिली व ३ पथके त्या युवकाला शोधण्यसाठी पाठवले. दरम्याने स्थानिक गुन्हे शाखा लोकेशनवर लक्ष ठेऊन होतेच आणि सागरी पथकाला हि सतर्क राहण्यास सांगितले होते. 

नानटे या गावाजवळ त्या युवकाची गाडी दापोली पोलिसांना रस्त्याच्या कडेला गाडी सापडली. आजूबाजूला शोधल्यावर तो युवक हि सापडला. त्या युवकाला दापोली पोलिसांनी समुपदेशन करून आत्महत्या करण्यापासून थांबविले व पोलीस स्टेशनला आणले. नंतर त्याच्या खेड येथील त्याच्या मेव्हुण्यांकडे सुपूर्द करण्यात आले. 

दापोलीत पोलिसांच्या पथकामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार संदीप गुजर, कॉन्स्टेबल सुनील पाटील, कोंकणी, कांबळे दुसऱ्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रहाटे, हवालदार दिपक गोरे तर तिसर्‍या मध्ये पोलीस उपनिरीक्षक कदम आदी होते.