प्रशासनाकडून प्लाझ्मा थेरपीसाठी प्रस्ताव


कोरोना फैलाव;  जिल्हा टास्क फोर्सची बैठक

रत्नागिरी:- कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करण्यासोबतच रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी सुरु करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरिय कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत झाला.   

कोरोना टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.   जिल्हयात कोरोनाचा पहिला रुग्ण 8 मार्च 2020 रोजी सापडला होता. त्यानंतर शुन्यांपर्यंत गेलेला कोरोना बाधितांचा आकडा आता 614 पर्यंत वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केसनिहाय, वय आणि लिंग यांच्या आधारे रुग्णसंख्येत झालेल्या वाढीबाबत सादरीकरणातून आढावा यावेळी घेण्यात आला.   

कॅच देम अर्ली अर्थात रुग्ण तपासणीचा वेग वाढवून लवकर निदान करणे आणि अर्ली रेफर अर्थात रुग्णाची प्रकृती बघून तातडीने त्यासाठी विशेषज्ञाचा सल्ला घेऊन उपचार करणे या माध्यमातून मृत्यू दर करण्याबाबत चर्चा झाली. आयसीएमआर ने काही नव्या औषध प्रणालीचाही सल्ला जारी केला आहे. यामध्ये टोसिलीझूमॅप हे इन्जेक्शन तसेच रेडमिसीडीवीर आणि फ्लॅबीसिवीर या गोळयांचा वापर सुचविण्यात आला आहे, यावरही चर्चा झाली.  प्लाझमा थेरपीचा कोरोना बाधितांना लाभ होत असून  यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. जिल्हयात अशी उपचार प्रणाली सुरु करण्याबाबत आयसीएमआरला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. मुंबईहून येणाऱ्या  महिला अणि विशेषत: जिल्हयातील गर्भवती महिलांची तपासणी वाढविण्याचा निर्णयही यावेळी झाला. जिल्हा रुग्णालयात नियमित रुग्ण उपचारांसोबत संशोधन कार्य देखील होण्याची आवश्यकता आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे तसेच कमिटीचे सदस्य असणारे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.