रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने मच्छीमार नौकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल 666 नौका आणि जाळ्यांचे नुकसान झाले. तब्बल 7 कोटी 54 लाख रुपयांचे हे नुकसान झाले असून प्रत्यक्ष नुकसानभरपाई मात्र 40 लाख 88 हजार रुपये इतकीच मिळणार होती. त्यात शासनाने विशेष बाब म्हणून वाढीव नुकसानभरपाईचा निर्णय घेतल्याने मिळणार्या भरपाईत थोडीफार वाढ होणार आहे.
31 मे रोजी मासेमारी व्यवसाय संपुष्टात आला. मासेमारी बंदीनंतर नौका किनाऱ्यावर ओढणे, मासेमारी जाळी सुकवणे ही कामे पूर्ण होण्यापूर्वीच कोकण किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकले. या वादळाचा मोठा फटका मच्छीमारांना बसला. अनेकांचे लाखोंच्या घरात नुकसान झाले. मत्स्य विभागाने तातडीने पंचनामे करून प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला. मात्र जाहीर झालेली मदत पाहून मच्छीमार आणखीनच हवालदिल झाले आहेत. वाढीव मदतीचा निर्णय देखील मच्छीमाराना दिलासा देऊ शकला नाही.
जुन्या परिपत्रकानुसार नौकांच्या अंशत: नुकसानीसाठी 4 हजार 100 रुपये, पूर्णत: नुकसानीसाठी 9 हजार 600 रुपये आणि जाळ्यांच्या नुकसानीसाठी 2 हजार 600 रुपये मिळत होते. आता सुधारित परिपत्रकानुसार अंशत: नुकसानीसाठी 10 हजार रुपये, पूर्णत: नुकसानीसाठी 25 हजार रुपये आणि जाळ्यांच्या नुकसानीसाठी 5 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र ही मदत पुरेशी नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.