कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच ऑपरेशन ‘ब्रेक द चेन’ – जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोनाची सोशल ट्रान्समिशनची साखळी तोडणे कठीण झाले. लोकांनी सोशल डिस्टन्सींचे तीन तेरा वाजवले. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर जेमतेम होऊ लागला. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसू लागला. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच ‘ब्रेक द चेन’ हे ऑपरेशन 1 ते 8 जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे. घरीच रहा सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.  

ते म्हणाले, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची भुमिका महत्त्वाची आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता 140 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोशल ट्रान्समिशन रोखण्यासाठी आपण ऑपरेशन ‘ब्रेक द चेन’ हे आजपासून राबविली आहे. लॉकडाउनमध्ये काहीशी शिथिलता दिल्यानंतर नागरिकांनी बंधने झुगारून दिली. यापूर्वी सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा काटेकोर वापर करत होती. मात्र आता ते करताना दिसत नाही. त्यातही शिथिलता आली. गांभीर्य राहिले नाही. हे रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा 1 ते 8 जुलै या दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.  
या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे कोरोनाचे सोशल ट्रान्समिशन रोखणे शक्य होणार आहे. म्हणून पूर्वी प्रमाणे काही दिवस लॉकडाऊन पाळा. घराबाहेर पडू नका, घरी रहा सुरक्षित राहा, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी केले आहे.