लॉकडाऊन; उद्यापासून जिल्ह्याच्या पाचही सीमा होणार बंद

रत्नागिरी:- एक तारखेपासून जिल्ह्यात सुरू होणार्‍या आठ दिवसाच्या लॉकडाउनसाठी जिल्हा पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्याच्या पाच सीमा सील करण्यात येणार असून कशेडी घाटात दंगल काबुत पथकासह 2 पॉइंट लावण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. विनाकारण बाहेर फिरणार्‍यांना वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 662 पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, असा तगडा बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी  दिली.

उद्यापासून जिल्ह्यात प्रवेश करता येईल असे पाचही मार्ग रोखले जाणार आहेत. आंबा घाट, कुंभार्ली घाट, कशेडी, हातीवले, म्हाप्रळ या ठिकाणी पोलिस पथके नेमली आहेत. मात्र सर्वांत जास्त कशेडी घाटात गर्दी होते. गेल्या तिन महिन्याचा अनुभव घेता, या ठिकाणी दोन पथके तैनात केली जाणार आहेत. तसेच दंगल काबुत पथकही नेमले जाणार आहे. मुंबईकडून येणार्‍याना कशेडीआधी एक किमी एक पथक असेल. ते पथक विनापास येणार्‍या वाहनधारकांना परत पाठविल. दुसरे पथक पास तपासणी करून वाहनधारकांना प्रवेश देईल. गर्दी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेने हा आराखडा केला आहे.

रत्नागिरीतही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मारूती मंदिर, परटवणे, काजरघाटी, भाट्ये आदी ठिकाणी पोलिस तपासणी केंद्र असणार आहेत.