रत्नागिरी:– कोरोनामुळे डळमळीत होत असलेला जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी पावले उचलली आहेत. कर्मचार्यांचे रखडलेली बिले, जनसुविधांतर्गत निधी खर्चावरुन झालेला गोंधळ, जिल्ह्यात निर्माण झालेला खताचा तुटवडा यावर तोडगा काढण्यासाठी अधिकार्यांच्या बैठका घेत त्यावर तोडगा काढण्यात यश आले आहे. राज्य आणि जिल्हा परिषद योजनांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्याचा निर्णय बने यांनी घेतला आहे.
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अधिकार्यांच्या कामकाजावरुन सदस्यांनी ताशेरे ओढले होते. त्याची गंभीर दखल घेत अध्यक्ष रोहन बने यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधण्यासाठी सुसंवाद निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहे. सर्व खात्यातील प्रमुख अधिकार्यांशी त्यांनी चर्चा केली आहे. प्राधान्य सर्वसाधारण सभेत उपस्थित केलेले प्रश्नांना दिले होते. त्यामध्ये शेतकर्यांना बांधावर खत मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. त्यासाठी कृषी अधिकारी, आरसीएफ कंपनी यांची बैठक घेतली होती. वैद्यकीय बिलांचे शंभरहून अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यावर दहा दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. 50 हजार रुपयांवरील बिले तत्काळ काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत.
जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या जनसुविधा योजनांतर्गत कामांवरुन सदस्यांमध्ये तिव्र नाराजी होती. तत्कालीन पालकमंत्र्यांनी 27 कोटीच्या कामांची यादी मंजूरी दिली होती. त्या कामांची बिले अद्यापही दिलेली नव्हती. हा विषय विद्यमान पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधत मार्गी लावला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील आश्वासित प्रगती योजनेंतर्गत नेमलेल्या नऊ कर्मचार्यांना कायम करण्याचा विषयही अंतिम टप्प्यात आहे.
सभापती, सदस्यांनी जिल्हा परिषदेतील कोणतीही माहिती मागितली तरीही ती तत्काळ दिली जावी अशा सुचना त्यांनी सामान्य प्रशासन अधिकारी यांच्यासह सर्वांना दिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सदस्यांकडून माहिती मिळाली नसल्याचा ठपका ठेवला जाणार नाही. राज्य आणि जिल्हा परिषदेचा योजनांचा आढावा घेण्यासाठी जुलै महिन्यात तालुकानिहाय आढावा बैठका घेण्याचा निर्णय बने यांनी घेतला आहे. यामध्ये अपूर्ण योजना, लागणारा निधी, सध्याच्या कामांची स्थिती यासह कोरोनाबाबतची माहितीही यात घेतली जाणार आहे. कोरोनापाठोपाठ निसर्ग वादळाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी खातेनिहाय आढावा बैठक घेऊन नुकसान झालेल्या जिल्हा परिषद मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा असा प्रयत्न सुरु केला आहे. सर्वात प्रथम शाळा सुस्थितीत आणण्यासाठी नियोजन सुरु झाले आहे.