रत्नागिरीत मुसळधार पावसाचे पुनरागमन 

रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी पुन्हा मुसळधार हजेरी लावली. सायंकाळ नंतर पावसाचा जोर वाढला होता. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग येणार आहे. 

जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळा पासून पावसाने सलामी दिली. अवघ्या पंधरा दिवसात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. प्रथमच सुरुवातीच्या पंधरा दिवसात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली. रेकॉर्डब्रेक पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव तुडुंब भरून गेले होते. समाधानकारक पावसाने जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला होता. 1 जुनपासून 21 पर्यंत जिल्ह्यात सरासरी 707 मिमी पावसाची नोंद झालेली होती; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. गेल्या सहा दिवसात 73 मिमी सरासरी पाऊस झालेला आहे. काही तालुक्यांमध्ये अत्यंत कमी पावसाची नोंद झाल्यामुळे त्याचा परिणाम भातशेतीवर होण्याची भीती होती. 
 

सलग पाच दिवस जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. पावसाअभावी पेरणी केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती होती. जुनच्या सुरवातीला पेरणी केलेले शेतकरी पावसाअभावी लावणीच्या प्रतिक्षेत होते. काही शेतकर्‍यांनी नदीचे पाणी घेऊन त्यावर लावण्यांची कामे सुरु केली.

 मात्र अनेक दिवसांची असलेली पावसाची प्रतीक्षा सोमवारी सायंकाळी संपुष्टात आली. सोमवारी सायंकाळी हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. सायंकाळी 6 ते 7 या कालावधीत मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. मंगळवारपासून जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.