जयगडमधील जहाजातील, कोरोनाबाधित रुग्णांच्या साहित्याची रत्नागिरीत विल्हेवाट; पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- जयगड मधील पोर्टवर आलेल्या प्रिया-23 या जहाजावरील कोरोना बाधित रुग्णांच्या साहित्यासह जहाजावरील साहित्य घेऊन त्याची रत्नागिरी शिरगाव येथे विल्हेवाट लावणाऱ्या पाच जणांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

ग्रामविकास अधिकारी वासुदेव शामराव सावके यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या नुसार समीर कादर खान (बाजारपेठ रत्नागिरी), अस्लम इस्माईल कर्लेकर, फकीर महंमद अली पांजरी, सिकंदर हसंमिया पटेल (सर्व रा. साखरतर) आणि मिलिंद तुकाराम बनप (घाणेकर आळी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या पाच जणांवर भा. द. वि. कलम 269, 270, 188 साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005  चे कलम 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
27 जून रोजी शिरगाव येथील परटवणे ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रोडवर हा प्रकार घडला. 

बोलेरो टेम्पो ( एम.एच .08 / एपी / 0645)  या वाहनावरील आरोपीत चालक समीर खान व त्याचे सोबत असणाऱ्या चौघांनी जाणीवपुर्वक आंग्रे पोर्ट जयगड येथील प्रिया -23 या जहाजावरील कोविड -19 या विषाणुने संक्रमित असलेल्या इसमांचे तसेच सदर जहाजावरील इतर साहित्य डिस्पोजल करणे करिता आणले.  साहित्य हाताळुन डिस्पोजल करणे करिता परटवणे ते साळवी स्टॉप जाणारे रोडलगत फिनोलेक्स कॉलनी ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या दक्षिणेस असलेल्या मोकळ्या जागेत टाकण्यास आणुन लोकांच्या जिवीतास कोरोना विषाणुचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होईल हे माहित असताना जिल्हाधिकारी यांनी लागू केलेला मनाई आदेश डावलल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.