पंचायत समितीच्या सभेत मागणी
रत्नागिरी:- शाळा सुरु करण्याचा निर्णय होत असला तरीही इमारतीमध्ये आरोग्यविषयक उपाययोजना करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये निधीची वानवा निर्माण होऊ शकते. त्याबाबत प्रशासन तयार आहे का असा प्रश्न उपस्थित करत पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी अनेक त्रुटी सभागृहापुढे आणल्या. यावर प्रशासनाने मार्गदर्शन मागवण्यात येणार असल्याचे सांगितले.
पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच पार पडली. यामध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापुर्वी शाळा सॅनिटाईज करणे, विद्यार्थ्यांना मास्क आणि साबण उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी 15 वित्त आयोगातून खर्च करावयाचा आहे. तसेच शाळा स्वच्छतेसाठी मनरेगातून निधी खर्च करावयाचा आहे. जुलै, ऑगस्टमध्ये शाळांचे कामकाज सुरु होणार आहे. अजूनही 14 वित्त आयोगातील निधीसंदर्भात कार्यवाही सुरुच आहे. 15 वित्तचे आराखडे मागवण्यात आले असून त्याचा निधी येईपर्यंत बराच काळ लागेल. त्यातही प्रत्येक ग्रामपंचयतीच्या लोकसंख्येनुसार निधी मिळतो. यामध्ये 25 टक्के आरोग्य शिक्षण सुविधांसाठी ठेवला जातो. एखादया गावाला एक लाख निधी आला तर त्यातील 25 हजार रुपये हे आरोग्य, शिक्षणावर खर्च करावे लागणार आहेत. गावाच्या परिसरात पाच ते सहा शाळा असतील तर तो कितीना पुरणार हा प्रश्नच आहे. त्यातही ग्रामपंचायतीकडे मनरेगाचा एक रुपयासुध्दा शिकि नाही. त्यामुळे शाळांच्या स्वच्छतेसाठी कुठून पैसा आणायचा, असे प्रश्न सदस्य गजानन पाटील यांनी उपस्थित केले.
प्राथमिक शाळांसाठी जिल्हा परिषद निधी देणार असेल तर माध्यमिक शाळांमध्येही तशीच व्यवस्था करावी लागणार आहे. दोन्ही गोष्टींसाठी प्रशासनाकडे निधीबाबत पाटील यांनी विचारणा केली असता नकारात्मक उत्तर मिळाले. यासंदर्भात मार्गदर्शन मागवा अशी सुचना पाटील यांनी केले. शाळांमध्ये असलेले शिक्षक हे दहा गावे फिरुन शाळेत येणार आहे. शासन निर्णयामध्ये शिक्षकांनी शाळा असलेल्या ठिकाणीच वास्तव्य करणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार असे पाटील यांनी विचारल्यानंतर गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला तर शिक्षकांना त्याच गावात राहण्याची सुचना दिली जाईल असे सांगितले.