आठ दिवसाची रसद भरुन ठेवण्यासाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 1 जुलैपासून आठ दिवस जिल्हा लॉकडाउन करण्यात येणार आहे. मात्र नागरिकांनी या आठ दिवसाची रसद गोळा करून ठेवण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. तळीरामांनी तर पुन्हा गैरसाय नको, म्हणून आठ दिवसाचा मद्याचा स्टॉक भरून ठेवण्यासाठी वाईन मार्टवर रांगाच्या रांगा लावल्या होत्या.  

जिल्ह्यात पुन्हा एकदा 1 ते 8 जुलै या आठ दिवसात कडक लॉकडाउन करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासन आणि मंत्री उदय सामंत यांनी काल जाहीर केले. त्यामुळे आठ दिवसाचे धान्य, जिन्नस, तेल, खाद्यपदार्थ आदीच्या खरेदीसाठी आज बाहेर पडल्याने बाजारपेठेत सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होती. नागरिकांनी आठ दिवस नव्हे; तर पुढील पंधरा दिवस ते महिनाभराचा जिन्नस भरून ठेवला आहे. भविष्यात लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यतेने नागरिकांनी ही खरेदी केली आहे.

एवढेच नाही, तर शहर आणि परिसरताली वाईन शॉपवरही मद्य प्रेमींनी गर्दी केली होती. गेल्या तीन महिन्यांमध्ये तळीरामांची प्रचंड गैरसोय झाली होती. या काळात वाइन मार्ट सुरू करण्यात यावेत यासाठी तळीरामांनी कळकळीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. यातून शासनाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही अटी-शर्थी घालून वाइन मार्ट सुरू करण्यात आले. त्यामुळे मोठा दिलासा मद्य प्रेमींना मिळाला. मात्र पुुन्ही आठ दिवस लॉकडाउन होणार असल्याने आठ दिवसाचा मद्याचा स्टॉक करून ठेवण्यासाठी मार्टवर प्रचंड गर्दी केली होती. मात्र या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजल्याचे दिसत
होते.